संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना ठार मारण्याच्या कट !
दोन जण पोलिसांच्या ताब्यात.

बीड(प्रतिनिधी)मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या दोघांची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दादा गरुड आणि अमोल खुणे असे ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नाव आहेत.प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र,पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही.
या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले असून आंदोलन समर्थकांमध्ये संतापाची भावना दिसून आली. सोशल मीडियावर अनेकांनी पोलिसांनी शक्य तितक्या तातडीने तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी व्यक्त केली आहे.काही सोशल मीडिया पोस्टमध्ये या कटामागे मोठी आर्थिक रक्कम आणि काही राजकीय नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्यांबाबत पोलिस किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अशा अनधिकृत चर्चांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पोलिस तपासाचे पुढील टप्पे आणि अधिकृत निष्कर्ष येणे बाकी आहे.
जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ :
पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जर वेळेवर कारवाई झाली नसती, तर गंभीर घटना घडली असती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी यावर सरकारकडे सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर सरकारने या कटामागील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरत आहे.







