बीड जिल्हा रुग्णालय आहे की चोरांचा अड्डा?
दिवसाढवळ्या रुग्णालयातिल पोलीस चौकी समोरून दुचाकी चोरीस."सुरक्षा रामभरोसे"

बीड – प्रतिनिधी बीड शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात चोरट्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालया समोरील पोलिस चौकीच्या अगदी मागे उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुग्णाला भेटण्यासाठी आलेले इम्रान काझी रा.मोमीनपुरा यांची दुचाकी क्रमांक MH23 AH 9819 ही दुचाकी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकी समोर लावून रुग्णालयात गेले होते. काही वेळातच परत येताच दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, या घटनेने बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
“चौकीसमोर चोरी,मग नागरिक कोणाच्या भरोशावर?” असा प्रश्न सर्वसामान्यला पडला आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच पोलिस चौकी असतानाही दिवसाढवळ्या अशी चोरी होणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे ठळक उदाहरण आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात चोरीच्या घटनांची मालिका सुरु असून, आता ती सरकारी संस्थांपर्यंत पोहोचली आहे.
बसस्थानक, बाजारपेठ आणि आता रुग्णालय — प्रत्येक ठिकाणी चोरट्यांनी आपला कहर मांडला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, “रुग्णालयात जीव वाचवायला येतो, पण बाहेर गाडी वाचेल का?” असा सवाल सर्वत्र केला जात आहे.
“सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज… पण इन्व्हर्टर नसल्याने बंद!”
या घटनेतील आणखी एक लज्जास्पद बाब म्हणजे — पोलिस चौकीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना इन्व्हर्टर कनेक्शनच नाही!
त्यामुळे चोरीच्या घटनेचे फुटेज मिळू शकलेले नाही. म्हणजेच, सुरक्षा साधने बसवली असली तरी ती केवळ शोभेची वस्तू ठरली आहेत.
शहरातील सर्वात महत्त्वाच्या रुग्णालयाबाहेर अशी बेपर्वाई असणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
“प्रशासन बघ्याची भूमिका घेतंय – नागरिक मात्र भयभीत”
शहरातील नागरिक आता शासकीय रुग्णालयात वाहन नेण्यासही घाबरत आहेत.
“चोरट्यांना भीती नाही, पोलिसांना जबाबदारी नाही आणि नागरिकच रोजचे बळी” — अशी भावना व्यक्त केली जात आहे.
चोरी झाल्यानंतरही पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरु न करता नेहमीचा “तपास सुरू आहे” हा ठरलेला प्रतिसाद दिला.
सुरक्षेच्या ‘इन्व्हर्टर’चे तीनतेरा.
जिल्हा मुख्यालयावरील शासकीय रुग्णालय हे आरोग्यसेवेचे केंद्र असले तरी आता ते चोरट्यांसाठीच सुरक्षित ठिकाण बनले आहे.
रुग्णालयासमोरच चौकी असताना चोरी घडणे म्हणजे नागरिकांचा विश्वासच हरवला आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर बीडकरांचा प्रश्न अधिक तीव्र होईल.




