यश ढाका हत्येतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी एसपी ऑफिस समोर मनसेचे धरणे आंदोलन.
न्यायाच्या मागणीसाठी 3 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

बीड दि. 31 ऑक्टोबर (प्रतिनिधी):यश ढाका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेच्या जिल्हाध्यक्ष व महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे यांनी केले.
मागील महिन्यात बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश ढाका याची काही व्यक्तींनी निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन बीड जिल्हा कारागृहात ठेवले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्याच्या अटकेसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मनसेकडून करण्यात आला.
घटनेला तब्बल एक महिना उलटूनही मुख्य आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
धरणे आंदोलनादरम्यान पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, आरोपीच्या अटकेसह संबंधित अधिकाऱ्यांवरही चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या:
1. यश ढाका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी.
2. पोलिसांनी निष्काळजीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
3. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.
या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी,ढाका कुटुंब,मित्रपरिवार व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यश ढाका हत्येतील आरोपीस अटक करण्यात यावी यासाठी येत्या 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.



