धक्कादायक ! केजच्या महिला डॉक्टरची फलटण मध्ये आत्महत्या.
सुसाईड नोटमध्ये PSI वर चार वेळा बलात्काराचा आरोप.


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोठरबन येथील रहिवासी आणि सध्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये परळीतील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा तसेच घरमालक असलेल्या प्रशांत बनकर या व्यक्तीने मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेने वैद्यकीय आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून डॉ. मुंडे या पोलीस व आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भातील वादानंतर त्यांच्या विरोधात चौकशी सुरू होती.या चौकशी दरम्यान पीएसआय बदने यांनी बलात्कार केल्याचा आरोप डॉक्टर मुंडे यांनी हातावर सुसाईड नोट मध्ये केला आहे.
फलटण सिटी पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(N) व 108 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपी PSI गोपाळ बदने (मूळ रा. परळी) हा सध्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.PSI बदने व प्रशांत बनकर हे दोघेही फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी अधिकाऱ्याच्या निलंबनासह दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत पोलिसांना सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मयत डॉक्टरच्या काकांनी सांगितले की, “तिला अनेकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. ती यामुळे अत्यंत मानसिक तणावात होती. तिने यापूर्वीही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, पण काहीच कारवाई झाली नाही.”
फलटण येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. डॉक्टरच्या हातावर लिहिलेला मजकूर पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा म्हणून जप्त केला आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, “आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचे निलंबन पूर्ण झाले आहे. तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे करण्यात येईल.”
या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असून, “महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी”अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे.




