पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक !
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे फोटोसेशन,पण रस्ता दुरुस्तीत प्रशासनाचे दुर्लक्ष–डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश :– (दि.३०) बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड रस्ता व पुल मुसळधार पावसात वाहून गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून या मार्गावरील वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती,मुळे वस्ती येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ पाहणी करून फोटोसेशन करून निघून जात आहेत, मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे सुरू न झाल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला आहे. अखेर आज (दि.३०, मंगळवार) सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत “अजितदादा, आता तरी पावताल का? आम्हाला रस्ता मिळेल का?” असा थेट सवाल उपस्थित केला.
१४ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसात हा रस्ता व पुल खचून वाहतूक ठप्प झाली. १५ सप्टेंबरला तलाठी गणपत पोतदार व ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर यांनी पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. १९ सप्टेंबर रोजी आमदार संदिप क्षीरसागर यांनी स्थळ पाहणी करत बांधकाम विभागाला पत्र दिले. त्यानंतर २३ रोजी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडून दोन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन घेतले. तरीदेखील काम सुरू न झाल्याने आज ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.
पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः २५ सप्टेंबर रोजी बीड दौऱ्यात खचलेले रस्ते व तुटलेले पुल तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, आदेशानंतरही सहा दिवस उलटून गेले तरी कामास सुरुवात झालेली नाही. “निदान या आंदोलनामुळे तरी प्रशासन खडबडून जागे होईल का?” असा संतप्त सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी उपस्थित केला.
या आंदोलनात संजय घोलप, अँड. गणेश वाणी, मधुकर जाधव,मनोहर वाणी, सखाराम घोलप, दत्तात्रय ढवळे, सोपान वाणी, प्रकाश ढवळे, शहाजी वाणी, सोनाजी घोलप, तानाजी वाणी, धीरज वाणी,सुरज वाणी,लहु घोलप, जनार्दन वाणी,अक्षय घोलप, विशाल घोलप, राजेंद्र वाणी, बबलु बागल,उमेश वाणी आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते




