मुसळधार पावसाचा कहर–जालना रोड वरील दुकानात पाणी शिरले.
मुसळधार पावसाने बीड शहराचा विकास उघडा पडला,दुकानात पाणी शिऱ्यालाने व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान.

बीड (प्रतिनिधी) :बीड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. विशेषतः बीड नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी योग्य ते नियोजन न करता नाल्यांची साफसफाई न केल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
बीड शहरातील वाहतुकीसाठी समजलं जाणारा मुख्य जालना रोड व बीड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या स्टेडियम परिसरात तर अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मुसळधार पावसाचे पाणी नाल्यांतून बाहेर जाऊ शकले नाही, परिणामी जालना रोडवरील गाळ्यामध्ये व परिसरातील रस्ते जलमय झाले.दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दुकानातील वस्तू पाण्यात भिजल्याने व्यापाऱ्यांचे हाल झाले असून काही साहित्य तर पाण्याखाली गेले आहे.
दरम्यान, नुकतेच पालकमंत्री अजित पवार यांनी स्टेडियम परिसराची पाहणी करून दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र पालकमंत्री येणार म्हणून बुजवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागा उपलब्ध न राहिल्याने संपूर्ण परिसरात पाणी साचले आणि दुकाने बुडाली.
यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सफाई कामगारांना बोलावून नाल्यांची मोकळाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच तहसीलदारांनी व्यापाऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ मदत द्यावी, अशीही मागणी होत आहे.
नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पावसाने सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त केले असून, यापुढे अशा घटना टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
बीड येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स जालना रोड या ठिकाणी जवळपास 15 ते 20 अंडरग्राउंड गाळ्यामध्ये पाणी गेल्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे
नालीचे पाणी स्टेडियमच्या एन्ट्री गेट पासून पुढे जात नसल्यामुळे ही सर्व पाणी दुकानात थांबले आहे यामध्ये भारत गॅस एजन्सी, गायकवाड कुशन, जेंट्स पार्लर, कुरियर इत्यादी सह अनेक दुकानाचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ कारभार व नियोजनमुळे नागरिकात, व्यापाऱ्यात संताप व्यक्त होत असून यानिमित्ताने बीडचा विकास उघडा पडल्याचे चित्र सध्या बीड शहरात पहावयास मिळत आहे.





