सौताडा घाटात रस्ता खचला !
जीव धोक्यात घालून वाहन धारकाचा प्रवास,वाहतूक ठप्प,बसेस वळविल्या साकत–पाटोदा मार्गे.

बीड( प्रतिनिधी) सौताडा घाटात आज सकाळी अचानक रस्ता खचल्याने मोठा पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.अचानक रस्ता खचल्याचे वाहन धारकाच्या निदर्शनास ही बाब आल्याने मोठा अपघात टळला.
या घटनेमुळे सौताडा घाटावरील सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. बीड जिल्हा अहमदनगर व पुणे विभागाशी जोडणारा हा घाट मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रस्ता खचला असला तरी चार चाकी लहान वाहने जीव धोक्यात घालून यावरून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एखादी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाहतूक वळवली साकत–पाटोदा मार्गे
रस्ता खचल्यामुळे बीडकडे येणाऱ्या व जामखेडकडे जाणाऱ्या एसटी बसेस तसेच इतर वाहनांना साकत–पाटोदा मार्गे वळविण्यात आले आहे. यामुळे प्रवासाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असून प्रवासी हैराण झाले आहेत.
प्रशासनाची तातडीची उपाययोजना :
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून संबंधित विभागांना तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. घाटावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पथदिवे व सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सुदैवाने जीवितहानी नाही :
रस्ता खचल्याच्या ठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्ता दुरुस्तीपर्यंत प्रवाशांना पर्यायी मार्गानेच प्रवास करावा लागणार आहे.




