टिप्परच्या धडकेने सरपंचासह नातीचा मृत्यू.
दवाखान्यातून परततांना टिप्परची सरपंचाच्या बुलेटला धडक पत्नीच्या डोळ्या समोरच पतीसह नातीचा मृत्यू.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून अपघाताचे सत्र सुरू आहे. परळी येथून दवाखान्यातून गावी परततांना भरधाव टिप्परने सरपंचाच्या बुलेटला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सरपंचासह नातीचा जागीच मृत्यू झाला. तर सरपंचाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात परळी-तेलगाव रोडवरील पांगरी गावाजवळ बुधवारी सायंकाळी घडला. पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीसह नातीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
परळी तालुक्यातील जळगव्हाण तांडा येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) हे पत्नी कस्तुराबाई चव्हाण आणि नात श्रुती विजय चव्हाण (वय ८) हे तिघे जण बुलेटवरुन परळी येथून गावाकडे जात होते. नात श्रुती हिला परळीतील दवाखान्यात दाखवून गावाकडे जात असतांना पांगरी गावाजवळ तेलगावकडून येणाऱ्या टिप्परने सरपंच चव्हाण यांच्या बुलेटला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) आणि त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी कस्तुराबाई चव्हाण या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भयानक होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या अपघातामुळे परळी-तेलगाव रोडवरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती.





