हत्या की आत्महत्या ! उपसरपंचाच्या डोक्यात गोळी झाडलेला मृतदेह आढळला.
बार्शीच्या मैत्रिणीला भेटायला गेला,कारमध्येच मृतदेह,पिस्टल आढळल्याने खळबळ.

गेवराई – तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंचाचा गोळीबाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बार्शीतील सासुरे गावात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या की हत्या याचे कारण अस्पष्ट असून, या घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
गोविंद जगन्नाथ बरगे वय 38 वर्ष रा. लुखामसला ता. गेवराई असे मृत झालेल्या उपसरपंच यांचे नाव आहे. बरगे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. त्यांचा व्यवसायात चांगला जम बसलेला होता. यादरम्यान त्यांचा संपर्क पारगाव थिएटरमधील नर्तिकेशी आला. दोघांची जवळीक वाढली. दोघांचेही प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळात बरगे यांनी प्रेयसीला सोन्याचांदीच्या नाण्यासह पावणेदोन लाखांचा मोबाईल गिफ्ट केला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. वाद मिटवण्यासाठी बरगे सोलापुरातील बार्शी Barshi तालुक्यातील सासुरे गावात गेले. चारचाकीतून त्यांनी गाव गाठलं. सोमवारी मध्यरात्री ते प्रेयसीच्या घरात पोहोचले, अशी माहिती समोर आली आहे
मंगळवारी सकाळी बरगे यांचा सासुरे गाव शिवारात कारमध्ये मृतदेह आढळून आल्याचे उघडकीस आले.
या घटनेची माहीती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे पोलिस पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. घटनेची पाहणी करत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठविण्यात आला. दरम्यान, गोविंद बरगे यांच्या डोक्याला पिस्टलची गोळी लागल्याची जखम आढळून आली असून, त्यांच्या कारमध्ये पिस्टल देखील निदर्शनास आल्याने बरगे यांनी गोळी मारून आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.




